पुणे, 10 सप्टेंबर : राज्यात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहात टोकाचे पाऊल उचल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने आज सकाळी येरवडा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली आहे. जितेंद्र (पप्पू) शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या आरोपीवर मानसिक आजारावर कारागृह मनोरूग्ण तज्ञ यांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. जितेंद्र शिंदे (पप्पू) हा याप्रकरणातील मुख्य आरोपी होता. येरवडा कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये पप्पूने टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या साहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. दरम्यान, कारागृह रक्षकाला हा प्रकार समजताच त्यांनी सहकाऱ्यांना बोलवत ही माहिती दिली. कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी कैद्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कारागृह पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोपर्डी बलात्कार प्रकरण –
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील 13 जुलै 2016 च्या संध्याकाशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करत जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तीन आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. अखेर, अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने नोव्हेंबर 2017 मध्ये त्या तीनही आरोपींना फाशीचा शिक्षा सुनावली होती. मात्र, या विरोधात त्यांनी मुंबई खंडपीठात अपील केले होते याची सुनावणी अद्याप सुरू होती.