ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 25 एप्रिल : पाचोरा शहरात एका कामानिमित्त एक मुलगी व तिचा भाऊ आला असता त्यांचा साधारण 15 ते 20 हजार किमंतीचा मोबाईल चुकून त्या ठिकाणी राहून गेला व ते तिथून निघून गेले. दरम्यान, पत्रकार जावीद शेख व लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे त्याचठिकाणी उपस्थित असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर जावीद शेख यांनी तो मोबाईल आपल्याजवळ घेऊन लगेच पाचोरा पोलीस स्टेशनला जमा केला.
पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पीएसआय प्रकाश चव्हाणके यांच्या ताब्यात मोबाईल दिल्यानंतर त्यांनी त्या मोबाईलवरून त्यांच्या परिवाराशी संपर्क साधला. यावेळी संबंधितांनी आमचा मोबाईल हरवला आहे, असे पोलिसांना सांगितले.
यानंतर संबंधित मुलगा पाचोरा पोलीस ठाण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पीएसआय प्रकाश चव्हाणके यांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्या मुलाने माहिती दिल्याप्रमाणे हा तोच मोबाईल आहे याची खात्री करून तो मोबाईल हरवलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिला.
हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाला त्याबद्दल त्या मुलाने पत्रकार जावीद शेख यांच्यासह पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, प्रकाश चव्हाणके यांचेही आभार मानले. यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दीपक पाटील, समीर पाटील हे उपस्थित होते.
हेही पाहा : ओळख प्रशासनाची : ग्रामपंचायत विभागाचं कामकाज कसं चालतं?, Dy. CEO भाऊसाहेब अकलाडे यांची विशेष मुलाखत