भुसावळ, 25 डिसेंबर : केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दि. २३ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर” या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचा समारोप आज प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी जी यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत बाविस्कर, डॉ. राजेंद्रजी फडके, तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा, महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
प्रथमच आयोजित होत असलेल्या या क्रीडा महोत्सवात रावेर लोकसभा क्षेत्रातील १० तालुक्यातील ६५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे क्रीडा आयोजन मानले जात आहे. हा क्रीडा महोत्सव युवकांमध्ये आरोग्य, शिस्त, संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.






