नाशिक, 10 जानेवारी : समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक गरजा लक्षात घेऊन ज्ञानाच्या प्रसारण करणाऱ्या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन आमदार तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. राहूल आहेर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमाला उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. राहूल आहेर उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्याख्याते पुण्याचे आर्मड फोर्स वैद्यकीय महाविद्यालयाच्या सायकॅट्री विभागाचे प्रमुख सर्जन कमोडोर डॉ. कौशिक चटर्जी, अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मनोगतात आमदार डॉ. राहूल आहेर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेला उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल. विद्यापीठाचे संस्थापक तथा राज्याचे माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. दौलतराव आहेर यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठाचे सुरु असलेले कार्य स्त्युत्य आहे. आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात दररोज मोठया प्रमाणात संशोधन होत असते. यासाठी नवीन तंत्रज्ञान व कौशल्य अभ्यासक्रमाची गरज असते. विद्यापीठाच्या उपक्रमांसाठी यापुढेही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, सामाजिक व शैक्षणिक कामाबरोबर विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोशल मिडियाच्या आभासी जगात वावरणारे विद्यार्थी मानसिकदृष्टया कमकुवत होत आहे. कमी वयात त्यांना विविध प्रकारचे मानसिक आजार होत असल्याचे संशोधनातून समोर येत आहे. विशेषतः तरुण वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थींनी मानसिकदृष्टया सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी योग, प्राणायम व मैदानी खेळांना अधिक महत्व दिले पाहिजे. समाजातील लोकांना मानसिक आधार मिळावा यासाठी ‘मानस’ ॲप महत्वपूर्ण आहे, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘मानस’ ॲपची लिंक उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, सर्वांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखणे गरजेचे आहे. यासाठी संतुलित आहार व योगाभ्यास आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी नियमांचे पालन केल्यास निरोगी दीर्घायुष्य मिळण्यास मदत होईल, याकरीता सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.
मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्यास प्रतिकुल परिस्थितीवर मात करणे शक्य – सर्जन कमोडोर डॉ. कौशिक चटर्जी
प्रतिकुल परिस्थितीला तोंड देण्यासाठी मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्यासाठी केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही चांगल वातावरण असण्याची आवश्यकता आहे. मन हे मेंदूचे सॉफ्टवेअर आहे. मानसिक विकासात क्रियाशिलतेसह भावनिक नियमन हा महत्त्वाचा पैलू आहे. स्मृती, समस्या सोडवणे, तर्क आणि नियोजन हे क्रियाशिलतेचे महत्त्वाचे गुणधर्म असल्याचे पुण्याचे आर्मड फोर्स वैद्यकीय महाविद्यालयाच्या सायकॅट्री विभागाचे प्रमुख सर्जन कमोडोर डॉ. कौशिक चटर्जी यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने डॉ. दौलतराव आहेर स्मृतीव्याख्यानमालेत मानसिक आरोग्यावर करण्यात आलेले मार्गदर्शन शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी महत्वपूर्ण ठरेल असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.
या व्याख्यानमाला उद्घाटन समारंभात जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेसाठी विद्यापीठ संशोधन विभागाचे प्राध्यापक ब्रिगे. डॉ. सौरव सेन, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे, डॉ. वैशाली गंभीरे, श्री. प्रशांत शिंदे यांनी काम पहिले. या व्याख्यानमालेस महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
एम.यु.एच.एस. स्टार परफॉर्मर
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात कार्यरत कर्मचाऱ्यांना ‘एम.यु.एच.एस स्टार परफॉर्मर’ म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. याप्रसंगी आमदार तथा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. राहूल आहेर, कुलगुरु महोदया, प्रति-कुलगुरु, कुलसचिव यांच्या हस्ते बॅच, रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आले. विद्यापीठातील वरिष्ठ सहायक विष्णु कचरु काळुंगे, वरिष्ठ लिपिक निलेश ओहळ, दैनंदिन वेतनपध्दतीवर कार्यरत गौरव श्रींग, शितल सुधीर शिंदे, संगीता जोशी यांना याप्रसंगी गौरविण्यात आले.
Comments 1