ईसा तडवी, प्रतिनिधी
लोहारी (पाचोरा), 28 जानेवारी : भारतीय सैन्यदलातील जवान भारत मातेची सेवा करताना सुट्टीवर आल्यानंतरही अनोखे कार्य करत आहेत. लोहारी येथील या आजी माजी जवानांनी फौजी पोलीस ग्रुपची स्थापना केली आणि या ग्रुपच्या माध्यमातून ते अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहेत. नेमकं ते काय कार्य करत आहेत, यामागे त्यांची काय भावना आहे, हे जाणून घेऊयात.
फौजी पोलीस ग्रुप असे या ग्रुपेच नाव आहे. याबाबत या ग्रुपचे सदस्य आणि सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत असलेले स्वप्नील कोळी यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, या ग्रुपची स्थापना 6 ऑगस्ट 2022 रोजी झाली होती. यामध्ये लोहारी गावातील भारतीय सैन्यदलातील तसेच महाराष्ट्र पोलीस सेवेतील आजी माजी जवानांचा समावेश आहे. या मध्ये ग्रुपमध्ये जवळपास 100 ते 150 जवानांचा समावेश आहे. गावातील आगामी पिढीला शिक्षणामध्ये तसेच नोकरीमध्ये प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने कार्य करण्यासाठी या ग्रुपची स्थापना करण्यात आली.
दरवर्षी या दिवशी कार्यक्रम –
या ग्रुपमधील सदस्यांनी सांगितले की, या ग्रुपच्या माध्यमातून 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला लोहारी या गावातील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यासोबत वाचनालयासाठी साहित्य वाटप केले जाते.
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात मदत –
या साहित्य वाटपाची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 रोजी झाली. यादिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन स्कूल बॅगेचे वाटप करण्यात आले. तसेच त्यानंतर 26 जानेवारी 2023 रोजी कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले. यानंतर 15 ऑगस्ट 2023 रोजी थर्मास वॉटर बॉटल विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. आता यावर्षी 26 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या शाळेत सराव पुस्तिका आणि अंगणवाडीत 100 पाट्या व पेन्सिल बॉक्सचे वाटप करुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
या ग्रुपच्या माध्यमातून गावामध्ये गावातील विद्यार्थी तरुणांना अभ्यास करता यावा, यासाठी वाचनालयाचीही स्थापना करण्यात आली आहे. या वाचनालयात लागणारी पुस्तके, टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी पुरवले जाते. सैन्यदलातील हे सर्व जवान आपापल्या ठिकाणी भारत मातेची सेवा करत असताना गावी आल्यावर गावातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांनाही भविष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहे. देश आणि समाजाचे आम्ही काही देणे लागतो, यासाठी आमच्या फौजी पोलीस ग्रुपच्या माध्यमातून कार्य केले जात असल्याची भावना या ग्रुपमधील सदस्यांनी व्यक्त केली.
शाळेतील पटसंख्या वाढली –
दरम्यान, फौजी पोलीस ग्रुपच्या माध्यमातून केले जात असलेल्या या कार्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढू लागली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. या ग्रुपच्या माध्यमातून केले जात असलेल्या कार्यामुळे शालेय व्यवस्थापनाकडून या फौजी पोलीस ग्रुपचा सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा : मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक! नवी मुंबईत दिवसभरात नेमकं काय घडलं?