चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 12 जुलै : जळगावात महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात आंदोलन सुरू असताना एक मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांनी मुख्यमंत्री तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, या उपोषणास महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिलाय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली असतानाही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परवानग्या रद्द केल्या. या कारणावरून भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत.
महाविकास आघाडीने दिला पाठिंबा –
एकीकडे महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्याविरोधात आंदोलन सुरू असताना त्यांनी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट दिली. हे सरकार शेतकऱ्यांना साथ देत नसून आपल्या सहकारी पक्षालाही हे सरकार साथ देत नाही. म्हणून या सरकारच्या विरोधात आमचा भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
राजकीय वर्तुळात खळबळ –
जळगावात एकीकडे महाविकास आघाडीचे सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात शिवसेना व भाजपमध्ये युती असताना देखील भाजप पदाधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात उपोषण सुरू केले आहे. यातच महाविकास आघाडीच्यावतीने माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत आपला आंदोलनास पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा