आळंदी (पुणे), 11 फेब्रुवारी : महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथे संतांचे सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचे दर्शन मला घेता येत आहे . तसेच शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज आळंदी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, योगी आदित्यनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती देखील लावली. या कार्यक्रमाला श्री. श्री. गोविंद महाराज, बाबा रामदेव, मंत्री चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला.
काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ –
योगी आदित्यनाथ म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले असून त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळत आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवले. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले होते. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारले नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे.
आळंदीला येण्याची होती इच्छा –
मला आळंदीत येण्याचे सौभाग्य लाभले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या परंपरेला नमस्कार करण्यासाठी आळंदीत आलो आहे. लहानपणी मी ज्ञानेश्वरीचे वाचन केले आहे. त्यांच्या आळंदीत येण्याची इच्छा होती. ज्यांनी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, त्यांच्या चरणी आज लीन होता आले हे माझे भाग्य असल्याचे ते योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
हेही वाचा : Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू