पाचोरा, 14 सप्टेंबर : आयुष्याच्या उत्तरार्धात उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून पाचोरा, भडगाव तालुक्यांसह जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी मैत्रेय कंपनीत कष्टाचे पैसे गुंतवले होते. मात्र, काही वर्षे झाली तरी ही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याप्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तोडगा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मैत्रेय असोशिएशनच्या वतीने करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 12 सप्टेंबरला मंगळवारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचोरा दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रारंभिक आंतरराष्ट्रीय एवं महिला अपराध संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मैत्रेय असोसिएनचे कार्यकर्ते यांच्या वतीने प्रारंभिक आंतरराष्ट्रीय एवं महिला अपराध संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) संघटनेच्या पाचोरा तालुका महिला अध्यक्षा व शिवसेनेच्या (शिंदे गट) पाचोरा तालुका अध्यक्षा मंदाकिनी पाटील यांनी राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून मैत्रेयमध्ये गुंतवणूकदारांना त्वरित पैसा मिळावा, अशी विनंती करत निवेदन दिले.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार किशोर पाटील हे उपस्थित होते.






