जालना, 21 फेब्रुवारी : राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजुर करण्यात आले. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली.
मनोज जरांगे काय म्हणाले? –
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यासाठी आणि सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी, मनोज जरांगे यांनी पत्रकारांसोबत बोलताना संवाद साधला. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही’ असे जरांगे म्हणाले.
आंदोलनाशिवाय पर्याय नाही –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, पुन्हा-पुन्हा जाणून बुजून सरकारने उपोषणाची, आंदोलनाची वेळ आणली आहे. सरकारला जे अपेक्षित होतं ते झाले नाही. सरकारने आणखी शहाणे झाले पाहिजे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला आहे. यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यासंदर्भात दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे