आंतरवाली (जालना), 18 फेब्रुवारी : सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाहीतर येत्या 21 फेब्रुवारीला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, त्यांचा उपोषणाचा 9 वा दिवस आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी त्यांची आग्रही भूमिका आहे.
मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा –
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सगेसोयरे अंमलबजावणीही करुन हवी आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून यावर काम सुरु आहे. कोट्यवधी मराठ्यांच्या हिताचा हा विषय आहे असून जर येत्या 20 फेब्रुवारीला ते मिळाले नाहीतर 21 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशी ठरवली जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा –
मराठा समाजाचे नेते गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत. दरम्यान, 5 ते 6 व्या दिवसापासून त्यांची प्रकृती खालवत जात होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांनी उपचार घेण्यास संमती दिली. डॉक्टरांच्या पथकाने आज सकाळी जरांगेंची आरोग्य तपासणी केली. तसेच यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’, महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?