अंतरावली (जालना), 2 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी मागील 9 दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे यांनी अखेर स्थगित केले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. जरांगे यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठाआरक्षणासंदर्भात अंतिम तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतचा म्हणजेच 2 महिन्यांचा वेळ सरकारला दिला आहे.
सरकारला दिली अंतिम मुदत –
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवत चालली होती. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्ट मंडळाने आज मनोज जरांगे यांची भेट प्रदीर्घ काळ चर्चा केली आणि मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला. यावेळी जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला. तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी –
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषण स्थळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान, आज मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेले. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचेही आश्वासन दिले.