जालना – ‘वैचारिक मतभेद जरी असले तरी एकमेकांचे अभिनंदन करण्याची, शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आमच्याकडून त्या तिघांचे खूप खूप अभिनंदन. त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची’, या शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावले आहे.
राज्यातील महायुती सरकारचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा काल पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- तिघांना शुभेच्छा.
- जनतेचे प्रश्न निकाली निघाले पाहिजेत.
- अवकाळीचा फटका. पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई द्यावी.
- आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाला काढावा.
- वैचारिक मतभेद असले तरी अभिनंदन करण्याची प्रथा. त्यामुळे तिघांना खूप खूप अभिनंदन. त्यांना शुभेच्छा.
- पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची.
- मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर उपोषणाची तारखेची घोषणा करू.
- सरकारने समाजाला सांभाळायला शिकायला हवे.
- जनतेने निवडून दिल्यावर जनतेचे मन जिंकण्याचे काम पुन्हा पुन्हा करायचे असते.
- फडणवीस मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असतील, तर चांगलीच बाब आहे.
- आम्ही आमच्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम.
- आम्ही आमच्या लेकरांसाठी लढू.
- आमचा समाज बरळणाऱ्यांना किंमत देत नाही. त्यांची औकात आम्हाला माहिती.