चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
बुलढाणा : अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आई वडील कमी शिकलेले असतील तर काही ठिकाणी मुलेही कमी शिकतात. मोल-मजूरी करतात असे दिसून येते. मात्र, या परंपरेला एका कुटुंबाने छेद दिला आहे आणि अशाच एका गिरणी कामगाराच्या मुलाने गरुडझेप घेत अत्यंत कठोर परिश्रम करत भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जाणारी यूपीएससी परीक्षेत देशात 155 वा क्रमांक मिळवला आहे.
डॉ. श्रीकृष्ण सुशीर असे या तरुणाचे नाव आहे. त्यांचे मूळ गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळी येथील रहिवासी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी या भारतातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी यश मिळवले आहे. त्यांच्या या यशानंतर सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपला यशस्वी आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास उलगडला.
डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांचे शिक्षण –
डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांचे पहिली ते दहावीचे शिक्षण हे दि न्यू इरा हायस्कूल येथे झाले. तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण हे अकोला येथील श्री. आर. एल. टी. महाविद्यालय येथे पूर्ण झाले. 2014 मध्ये बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा त्याच वर्षी इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे एमबीबीएसला नंबर लागला. एमबीबीएसच्या शिक्षणानंतर त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली. यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून जवळपास सव्वा वर्ष सेवा बजावली.
डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी –
कुटुंबाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या आई आणि वडील दोन्हीही फक्त पाचवी पास आहे. त्यांचे वडील हे जळगाव जामोदला सूतगिरणीमध्ये कामगार होते. 1984 पासून ते 1998 पर्यंत ते त्याठिकाणी कामगार होते. त्यानंतर ही सूतगिरणी बंद पडल्यावर त्यांनी गावी परत न जाता दूधाचा व्यवसाय सुरू केला. तसेच सोबत शेतमजूरीही केली. डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांना चार मोठ्या बहिणी असून यामध्ये दोन मोठ्या बहिणी शिक्षिका तर एक बहीण डेंटल सर्जन आणि एक बहीण आयुर्वेदामध्ये एमडी आहे. आम्हाला संपत्ती जमा करायची नव्हती तर आमची मुले घडवायची होती, याच विचारातून माझ्या आईवडिलांनी आमचे पालन पोषण केले आणि त्यामुळे आम्ही सर्वजण चांगले शिक्षण घेऊ शकलो, असे त्यांनी सांगितले. आज इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आई वडिलांनी आम्हाला मोठं केलं, आज माझ्या या यशानंतर जेव्हा माझ्या आई-वडिलांचा सत्कार होतो. तेव्हा ते पाहून खूप छान वा़टतं आनंद होतो. आपण आयुष्यात काहीतरी कमावलं अशी भावना मनात तयार होते.
यूपीएससीची तयारी –
मी यूपीएससी करण्याचं स्वप्न हे बालपणापासूनच पाहिलं होतं. मात्र, बॅकअप प्लान हवा म्हणून मी आधी एमबीबीएस करायचं ठरवलं. यूपीएससीमध्ये नाही तर झालं तर एमडी करता येईल, स्वत:चं क्लिनिक करता येईल, असा विचार होता. यानंतर 2021 मध्ये मी पहिल्यांदा यूपीएससीची पूर्व परीक्षा दिली. त्यामध्ये मला अपयश आले. 2022 मध्ये मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो. पण अंतिम यादीत अपयश आले. मग 2023 मध्ये पुन्हा तयारी केली आणि यावेळी यश मिळाले. संपूर्ण भारतात 155 वी रँक मिळवत मी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो.
लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं होतं. ते पूर्ण झालं. प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबीयांनी सहकार्य केले. त्याचं कुठेतरी आपण चीज केलं, असं वाटतं. पण यासोबतच भविष्यात आपल्यावर मोठी जबाबदारीही येईल, याचीही जाणीव आहे, असेही म्हणाले. तसेच यूपीएससीची तयारी बाबत त्यांनी सांगितलं की, मी कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. फक्त मेन्ससाठी टेस्ट सीरीज लावली होती. मी पुणे महानगर पालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करत करत परीक्षेची तयारी केली. तसेच मुलाखतीच्या दोन महिन्याआधी मी दिल्लीला गेलो होतो. तिथे मी अनेक क्लासेसचे Mock Interview दिले. त्याची मला खूप मदत झाली, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शिक्षकांनी अगदी समर्पण भावातून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थी निश्चितच चांगल्या पदावर जाऊ शकतात, क्वालिटी एज्युकेशनवर भर देणे महत्त्वाचे आहे. मला चांगले शिक्षक लाभले. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने झालं. त्यामुळे माझा पाया पक्का झाला. मी सेल्फ स्टडी करू शकलो. माझ्या यशात माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.
तरुणाईला संदेश –
ग्रामीण भागातील तरुणाईला संदेश देताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये आपण एवढी मोठी परीक्षा पास करू शकतो की नाही, याबाबत न्यूनगंड असतो. तसंच त्यांना माहितीचा अभाव असतो. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे टॅलेंट असूनही त्याला दिशा मिळत नाही आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षा जर असेल तर व्यक्तीला रस्ते मिळतच जातात. तसेच यूपीएससी किंवा एमपीएसी पॅनेल ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. त्यामुळे आपण मेहनत करत राहायचं. प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हला दिलेल्या माध्यमातून यावेळी तरुणाईला दिला.
भविष्यात या तीन विषयांवर काम करणार –
मी स्वत: ग्रामीण भागातून येत असल्याने शिक्षण आणि आरोग्य मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे भविष्यात आयएएस अधिकारी म्हणून ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य या तीन प्रमुख विषयांवर प्राथमिकतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला