चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नाशिक, 30 एप्रिल : देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे टप्पे पार पडत असले तरी नाशिकमधील जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, नाशिकमधील जागेचा तिढा सुटण्यासाठी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन हे तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली.
नाशिकच्या जागेचा तिढा कायम –
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सध्या तिकिटाच्या प्रतिक्षेत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी नाशिक लोकसभेवर दावा सांगितला असून यासाठी धार्मिक ठिकाणी दर्शन घेऊन प्रचारास सुरूवात केल्याचेही पाहायला मिळले. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तीनही पक्षातील नेत्यांनी दावा केल्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटत नाहीये.
मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल –
हेमंत गोडसे हे शिंदेंच्या शिवसनेचे खासदार असले तरी त्यांना अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अलीकडच्या काळात नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांचे देखील नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसाठी संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले असून महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : “उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे तर जेलमध्ये पाठवायला हवं,” अभिनेते किरण मानेंची फेसबुक पोस्ट