चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 30 एप्रिल : जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून नुकतीच उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी उज्ज्वल निकम यांच्यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
किरण माने यांनी फेसबुक माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये ते म्हणाले की, “उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं.” असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील? पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागीतली. त्यांनी एक पुस्तक लिहीलं… ‘करकरेंना का व कोणी मारले?’
त्या पुस्तकात त्यांनी काही सिक्रेटस् ओपन केली आहेत. मुश्रीफसाहेब म्हणतात, : “पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे, याची डिटेल माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला १९ नोव्हेंबर २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही आणि हा हल्ला होऊ दिला.
प्रभाकर अलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होतं. यात शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले… तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले. त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते… का??? तर उज्जवल निकम यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर्.एस्.एस्. च्या आतल्या गोटातले आहेत !”
कोण आहेत किरण माने? –
बिग बॉस फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मराठी टीव्ही मालिकेतून चर्चेत आलेले अभिनेते किरण माने होय. अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या किरण मानेंचा हे मुळचे सातारा जिल्ह्यामधील मायणी येथील आहेत. किरण माने हे नाव त्यांच्या खळबळ उडवून देणाऱ्या विधानामुळे ते नेहमी चर्चेत असतात. राजकीय पोस्ट आणि सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकांमुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत.
हेही वाचा : “आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत,” साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?