चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 26 मे : जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाला तत्काळ पंचानामे करण्याचे आदेश दिले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी खान्देशात भाजप किती जागा जिंकणार याबाबत मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –
मंत्री गिरीश महाजन माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, घोडामैदान समोर असून जळगाव लोकसभेच्या जागेबाबतच्या सगळ्या बातम्या, निराधार गोष्टी आहेत. म्हणून आपण 4 तारखेला भेटू. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेदवाराला सर्वात उच्चांकी आणि विक्रमी मत मिळतील. लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच महायुतीच्या सर्वात जास्त जागा ह्या महाराष्ट्रातून निवडून येतील, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
रामदेववाडी अपघातावर काय म्हणाले? –
रामदेववाडी अपघातातील दोषींना न्याय मिळत नसल्याचा आरोप केला जात होता. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ज्या दिवशी अपघात झाला त्यादिवशी मी रात्रभर जळगाव जिल्हा रुग्णालयात होतो. माझे सर्व आमदार पदाधिकारी-कार्यकर्ते सर्व रुग्णालयात होते. सकाळी मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा तेथे उपस्थित होते. त्यामुळे मंत्र्यांनी दखल घेतली नाही, असे होणार नाही. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोललो. या प्रकरणात कोणाचाही राजकीय दबाव नाही आणि या जो कोणी असेल त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, आम्ही मयत कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपयांचा धनादेश देत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार –
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, आम्हाला देशात स्पष्ट बहुमत मिळेल. मोठ्या मतांनी देशात आमचे खासदार निवडून येतील व पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे ठरवले आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. दरम्यान, संजय राऊतांना 4 जूनला निकाल लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल असे त्यांनी केलेल्या नितीन गडकरींबाबतच्या दाव्यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले.