जळगाव, 14 एप्रिल : एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा एका पत्रकाराचा हवाला देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी आता मोठं पाऊल उचललं असून एकनाथ खडसे तसेच अनिल थत्ते हे अडचणीत येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय प्रकरण? –
एकनाथ खडसे यांनी गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्यासंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटाचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे म्हणाले होते की, गिरीश महाराजांनाच्या रंगल्या रात्री अशा विषयाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली असून त्यात गिरीश महाजानांचे महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत, असे त्या पत्रकाराने सांगितले आहे. दरम्यान, या आरोपांसंदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही खडसे म्हणाले होते. यावरून त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
एकनाथ खडसे- अनिल थत्ते यांना अब्रुनुकसानीची नोटीस –
एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे आणि अनिल थत्ते यांनी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी कायदेशीर पावलं उचलण्याचे निश्चित केले आहे. एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे तसेच अनिल थत्ते यांनी आपली प्रतिमा मलिन केल्याचे सांगत गिरीश महाजनांच्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तर दुसरीकडे अनिल थत्ते यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे अब्रुनुकसानीची नोटीस मिळाल्याची माहिती दिली आहे. यावरूनच आता अनिल थत्ते-एकनाथ खडसे अडचणीत येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.