जळगाव, 15 जून : भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून अगदी महासागरासारखा हा पक्ष आहे. यामुळे अनेकांना या महासागरात विलिन व्हावसं वाटतं. तसेच अनेक जणांना त्यांचं राजकीय भविष्य अंधकारमय वाटत असून खूप मोठा ओढा आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी वाढलाय, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विशेषतः शिवसेना उबाठा तसेच शरद पवार गटातील नेते-पदाधिकारी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले? –
जळगावात पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, निवडणुका आता तोंडावर आहेत. यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा ओढा हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आहे. देशभरात एकच पक्ष असून हा महासागर आहे. त्यामध्ये विलीन व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय. जळगाव किंवा मुक्ताईनगरचा विषय नसून येत्या काळात माजी आमदार, खासदार, राजकीय, सहकार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मात्तबर नेते भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असून ज्याप्रमाणे त्यांच्या कामाचा आवाका आहे. ते पाहून सगळ्यांना असं वाटतं की त्यांचं राजकीय भविष्य अंधकारमय आहे. म्हणून भाजपमध्ये येण्यासाठी ते उत्सुक आहेत. विशेषतः शिवसेना उबाठा तसेच शरद पवार गटातील नेते-पदाधिकारी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
संजय राऊतांवर टीका –
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विमान अपघातानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावरून मंत्री महाजन यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. एवढा मोठा अपघात झाला अन् तासाभरातच त्यांनी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली. यामुळे संजय राऊत हा बोलण्यासारखा किंवा उत्तर देण्यासारखा विषय नाही, असे मंत्री महाजन म्हणाले.






