जळगाव, 20 सप्टेंबर : जळगावात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मोर्चात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची देखील उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील मंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान, जळगावातील जनआक्रोश मोर्चात झालेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेत उन्मेश पाटील-बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्री गुलाबराव पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर –
धरणगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, उन्मेश पाटील हे पाच वर्ष खासदार होते. मात्र, ते कुठेच आले नाहीत. आता काय शेतकरी सांगत आहात. मोर्चा काढणं हा तुमचा धंदा नसून तो आमचा धंदा आहे. आम्ही शिंगाडा मोर्चा काढायचो तर असे 10-20 लोकं यायचे का? दरम्यान, बच्चू कडू म्हणाले की, गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढेन. पण त्यांनी स्वतःच यावं. मात्र, त्यांनी पाळधीत येऊन तर दाखवावं, असं आव्हानच मंत्री पाटील यांनी दिलंय.
View this post on Instagram
आमचे मंत्री, खासदार तसेच आमदार निष्क्रिय आहेत, अशी विनाकारण वल्गना करत असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही महायुतीचं लोकं शेतकऱ्याची काळजी घेतो ती कोणीही घेत नाही. दरम्यान, कोणही आलं तर काहीही बोलून जातं. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी देखील बोलतं-चालतं माईक झालं पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
बच्चू कडू यांनी दिला होता इशारा –
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी जळगावात निघालेल्या आक्रोश मोर्चात माजी राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोर्चात उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले आणि भाषणात बोलताना त्यानी जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. तसेच आता पुढचा मोर्चा हा थेट मंत्र्यांच्या घरावर न्यायचा असून गुलाबराव पाटील यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, बच्चू कडूंच्या इशाऱ्याला आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत मोठं आव्हान दिलंय.