जळगाव – गुलाबराव देवकर कोणत्याही पक्षात गेले त्यांच्या गैरव्यवहाराची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांना घेऊन कोणत्याही पक्षाने आपल्या अंगावर शिंतोडे उडवू नये, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला सल्ला दिला आहे. गुलाबराव देवकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय गिरीश महाजन घेतील, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले असल्याचे माध्यमांच्या प्रश्नांवर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गुलाबराव देवकर कोणत्याही पक्षात गेले त्यांच्या गैरव्यवहाराची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांना घेऊन कोणत्याही पक्षाने आपल्या अंगावर शिंतोडे उडवू नये. यांचे बँकेचे, पतसंस्थेचे गैरव्यवहार, मजूर फेडरेशनचे गैरव्यवहार हे सर्व लपवण्यासाठी ते या ना त्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि भाजपला अशी काही गरज राहिली नाही.
132 आमदारांचा पक्ष आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. गुलाबराव देवकर आल्यानंतर ते पक्षाचा 50 पट भाव वाढवून देतील, असा काही माणूस नाही. ज्या लोकांनी 85 हजार मते दिली, त्या माणसांना सोडायला हा माणूस 5 दिवसात तयार होत आहे, उद्या जर भाजपमध्ये आला आणि भाजपमध्ये थोडा प्रॉब्लेम वाटला तर एक मिनिटात भाजप सोडून देईल. अशा माणसाला घेऊन भाजप वाढणार नाही, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार टीका केली.
गुलाबराव देवकर करणार शरद पवार गटाला रामराम –
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदरासंघात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात जाणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, आता ते भाजपमध्येही जाण्याच्या चर्चा आहेत. गुलाबराव देवकर आगामी काळात कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
VIDEO – Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद