पंढरपुर, 6 जुलै : लोकसभेचे निकाल हे असे का आले, हे सगळ्यांना माहित असून ही फक्त सूज आहे, जी येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केली. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले असता मंत्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील? –
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंढरपुर दौऱ्यानिमित्त मंत्र गुलाबराव पाटील यांनी टोल लगावला. ते म्हणाले की, आम्ही सिझनेबल पुढारी नाहीये. त्यांना विठ्ठलाला काहीतरी मागायचे असेल. आम्ही मात्र देवाने दिले तरी येतो आणि नाही दिले तरी येतो. मी गेले 31 वर्षे अखंड वारी करीत असून आम्हाला देवाजवळ काही मागायचे नसते, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
संजय राऊतांवर टीका –
मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, हे भूत आमच्यामुळे निवडून आले, याला स्वतःला पोरं होत नाहीत, म्हणून दुसऱ्याच्या पोरांना दत्तक घेण्याची धडपड करीत आहेत. तो कुबुद्धीचा माणूस असून त्याला कधीच सुबुद्धी येणार नाही. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असून त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला लागणाऱ्या 23 मतांच्या कोटा एवढी मते आम्ही जुळविल्याचा दावाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले? –
मनोज जरांगेंबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखे कोणीही दिले नाही, मराठा समाजाला टिकणारे 10 टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनीच दिले. जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीबाबत मुख्यमंत्री ओबीसी समाजाशी चर्चा करून मार्ग काढतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हीच जिंकणार असाही दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
हेही वाचा : ‘आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेट कुणीही…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?