ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शैलीत जोरदार भाषण करत महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि उन्मेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन आम्ही फिरतोय. मात्र, ज्यावेळी शिवसेना पक्षाचा निर्णय चुकीचा झाला, त्यावेळी 20 आमदार सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना सांगून आलेला मी कार्यकर्ता आहे. आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहे. पण उद्धव ठाकरेंनी ते ऐकले नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही गुवाहटीला गेलो. आणि हे आता आम्हाला गद्दार म्हणताय आणि तुम्ही मूळ शिवसेनेचे आहेत का?, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित केला.
“पंधरा दिन पहिले तुम्ही भाजपमा होतात, करण पवार पण आणि उन्मेश पाटील पण,” असे ऐराणीत म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता तुम्ही आम्हाला गद्दार म्हणून बदनाम करू शकतात काय, असा सवाल त्यांनी करण पवार आणि उन्मेश पाटील यांना केला. तसेच त्यांच्याकडून अफवा पसरविल्या जात असल्याची टीकाही मंत्री पाटील यांनी केली.
देशात एकच उमेदवार उभा –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ही निवडणूक गटर, मीटर आणि वॉटरची नाहीये. ही निवडणूक जिल्हा परिषद किंवा आमदारकीची नाही. तर ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मी प्रत्येक भाषणात सांगत आलोय की, या निवडणुकीत स्मिता वाघ ह्या नाममात्र उमेदवार आहेत. देशातील 544 ठिकाणी एकच उमेदवार उभे आहेत आणि त्यांचे नाव नरेंद्र दामोदारदास मोदी आणि त्यांना आपल्याला विजयी करायचे आहे, असे त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात सांगितले.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, मधुकर काटे, रावसाहेब मनोहर पाटील यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.