ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचारो, 5 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या महायुतीच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने आमच्यावर लादलेला आणि 15 दिवसांत खासदार झालेल्या निष्क्रिय खासदाराचे तिकिट कापले आणि आमच्या कर्तव्यदक्ष स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली. यामुळे मी भाजपच्या नेतृत्वाचे आभार मानतो.
त्यांचेही काही न पाहता या मतदारसंघाने त्यांना 5 लाख मताधिक्याने निवडून दिले. त्यांना आमदारकी दिली, खासदारकी दिली आणि पक्षाने उमेदवारी नाकारताच आता उबाठामध्ये टिवटिव करण्याचे ते काम करत आहेत, अशी मिश्किल टिप्पणी किशोर पाटील यांनी उन्मेश पाटील यांच्यावर केली.
इलेक्शन दिल्लीचे आणि प्रश्न विचारताय गल्लीचे –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. जिथे दहा वर्ष सत्तेत होतात तिथे तुम्ही काय काम केले ते सांगू शकत नाही. आणि दिल्लीचे राजकारण असताना तुम्ही आता गल्लीत सांगताय. इलेक्शन दिल्लीचे आणि प्रश्न विचारताय गल्लीचे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच स्मिता वाघ यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. स्मिताताई ह्या कर्तव्यदक्ष महिला आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठपणे भाजपचे ते काम करत आहेत, असेही किशोर पाटील म्हणाले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, मधुकर काटे, रावसाहेब मनोहर पाटील यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : “….म्हणून मला या पक्षात थांबयचंय,” मुक्ताईनगरात रोहिणी खडसेंनी सांगितले शरद पवार गटात राहण्याचे नेमकं कारण