मुंबई, 12 फेब्रुवारी : नवी दिल्लीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधत संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
पुरस्कार विकत सुद्धा घेतला जातात, अशी टीका एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर संजय राऊतांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, महादजी शिंदे हे नाव खुप मोठं आहे. त्यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार विकत घेतला जाऊ शकतो का?, खरंतर, मराठा समाजाच्या राजाबद्दल अशापद्धतीचे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावणे आहे. त्यांना जनता माफ करणार नाही. दरम्यान, ज्यांनी शिवसेना फोडण्यात दलाली केली, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, त्या संजय राऊतांच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. त्यांनी शिवसेना तर संपवली यासोबतच राष्ट्रवादी तसेच काँग्रेस देखील त्यांनी संपवली आणि आता राहिलेली शिवसेना देखील संपविण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, अशी टीका गुलाबराव पाटलांनी राऊतांवर केलीय. संजय राऊत स्वतःच बिघडलेले –
एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने संजय राऊतांनी पवारांवर देखील टीका केलीय. त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. शरद पवार हे राज्याचे तसेच देशाचे मोठे नेते आहेत. ज्यांनी चांगलं कार्य केले असेल त्यांचा गौरव होत असेल आणि त्यामुळे शरद पवारांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे पक्षांतर होणे आणि एकमेकांचे विचार बदलणे, असे होत नाही. दरम्यान, ‘ते’ स्वतःच बिघडलेले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही,असा टोला मंत्री पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली –
एकनाथ शिंदेंमुळे ठाण्यात शिवसेना वाढीस आली असे शरद पवार म्हणाले होते. त्यावरून देखील संजय राऊतांनी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ठाण्यात दीघे साहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली आणि सर्वत्र विकास केला. ज्याठिकाणी बाळासाहेब म्हणायचे ठाणे तिथे उणे त्या ठाण्याचे स्वरूप आज बघितले पाहिजे. ठाण्यासाठी भरघोस निधी आणून रस्ते, पाणी तसेच एमआयडीसीचा विकास करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. खरंतर, “महापालिकेचे रस्ते झाडण्याचे काम संजय राऊतानीच केलं. हा चपराशी माणूस, हातात पेन घेऊन त्यानी काम केले आणि तो काय ठाण्याच्या विकासाबाबत बोलेले,” असा एकेरी उल्लेख करत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत