नागपूर, 4 मार्च : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया –
नागपुरात महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ ‘माफसू’ चा 12 वा दीक्षांत समारोह आज संपन्न झाला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय. मी त्याचं स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामा पेक्षा शपथच व्हायला पाहिजे होती. यामुळे या सर्व गोष्टींना कदाचित या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनीही आधीच राजीनामा घ्यायला हवा होता. धनंजय यांनी सुद्धा आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता.
जो काही निर्णय घेतलाय तो योग्य –
मला माहित नाही त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय. मी त्यांच्यापेक्षा लहान बहिण आहे. मात्र, बहिण जरी असली आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं. पण कोणत्याही बहिणीला अथवा परिवाराला वाटत नाही, आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुखःतून जावं लागेल. दरम्यान, जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो, त्यावेळी आपण राज्यातील सर्वांचा सारखा विचार केला पाहिजे. संतोष देशमुख यांच्या जीवाच्या वेदनांपुढे आणि परिवाराच्या हा काहीही मोठा निर्णय नाही. त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे. मला वाटतं देर आए दुरस्त आहे, अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
हेही वाचा : dhananjay munde resignation : मंत्रिपदाचा राजीनामा का दिला?, स्वत: धनंजय मुंडेंनीच सांगितलं कारण