नागपूर, 22 डिसेंबर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या 2 वर्षात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित उडान संमेलनात ते बोलत होते. सत्यनारायण नूवाल आणि पद्मश्री डॉ. डी. के. यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. आर. एल. सोनोलिकर, अरुण दांडेकर यांना जीवन गौरव प्रदान करण्यात आला. तसेच लाइफ टाइम अचिव्हमेंट दीपक लव्हाळा यांना, ज्वेल ऑफ एलआयटी डॉ. सुगंधा गारवे, कीर्ती गणोरकर, आर.जी. कृष्णन, अमित सिन्हा, नीरा चंदना यांना, तर युथ आयकॉन पुरस्कार चिंतन शाह यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आज सर्वच क्षेत्रात एआयचा वापर होतो आहे. ती काळाची गरज आहे, त्यामुळे एल आय टी सारख्या संस्थानी मोठ्या प्रमाणात एआयचा स्वीकार करावा, असे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले की, हे झाले तर जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी आपण विद्यार्थी घडवू शकू.
फक्त अभ्यासक्रमांनी शिक्षण संस्था मोठी होत नाही, तर ती मोठी होते ती तिच्या विद्यार्थ्यांमुळे, असे पद्मश्री डॉ. यादव यावेळी म्हणाले. दृढ संकल्प असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते, असे सत्यनारायण नूवाल यांनी सांगितले.
रावबहादूर डी. लक्ष्मी नारायण यांना लक्ष्मीनारायण गीताद्वारे अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माधव लाभे यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत माधव लाभे यांनी केले. सत्यनारायण नूवाल यांचे स्वागत कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी, तर पद्मश्री डॉ. यादव यांचे स्वागत मोहन पांडे यांनी केले. संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते झाले. राकेश गुप्ता, उत्कर्ष खोपकर, मोहन पांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सचिन पळसोडकर आणि मिली जुनेजा यांनी केले. आभार डॉ. वैद्य यांनी मानले.






