पारोळा, 13 जुलै : दैनंदिन कामकाजासाठी पंचायत समितीत वेळोवेळी येणाऱ्या नागरिकांची फिरवा-फिरव केली जाते. शेतकऱ्यांसाठी असलेल्या पाणंद रस्ते योजनेची मष्टर बंद आहेत, त्यामुळे रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. पाणंद रस्त्यांबाबत मोठ्या तक्रारी आहेत, यापुढे या तक्रारी पुर्णपणे बंद झाल्या पाहिजेत. तसेच पंचायत समितीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा, अशा सूचना पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील यांनी दिल्या. तसेच पैशांची मागणी यापुढे कुणी कर्मचाऱ्याने केली तर त्यावर कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिलाय.
आमदार अमोल पाटील यांनी घेतली आढावा बैठक –
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांची आढावा बैठक आज शनिवार रोजी आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या घरकुल, शिक्षण, सिंचन, पशुवैद्यकीय, आरोग्य, रोजगार हमी, बांधकाम, कृषि, महिला व बालविकास यांसह अन्य विभागांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, गटविकास अधिकारी संजय मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत सुर्यवंशी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आमदार अमोल पाटील यांच्या महत्वपुर्ण सूचना –
पंचायत समितीत गेल्या वेळीचा कारवायांनी चांगलीच गाजली आहे. अनेक अधिकारी, जास्त करून घरकुल विभाग गोर-गरिब, सर्वसामान्य नागरिकांकडुन पैशांची मागणी करतात. तसेच पंचायत समिती हे ग्रामिण भागातील जनतेचा दैनंदिन कामकाजासाठी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांचातील दुवा आहे. अशात जनतेची करण्यासाठी आपल्याला पगार देते, तरी देखील नागरिकांचा समस्येचे निराकरण होणेस विलंब का होतो ? पगार असतांना देखील गोर-गरिब, सर्वसामान्य नागरिकांकडुन पैशांची मागणी का केली जाते ? असा सवालही आमदार अमोल पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला.
दरम्यान, यापुढे एकही तक्रार अथवा पैशांचा मागणीचे प्रकरण समोर आल्यास जो कुणी असेल त्याची गय केली जाणार नसल्याचे आमदार अमोल पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.