चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 19 मे : भारतरत्न सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करु नये, यासाठी आम्ही खुप विनंती केली. त्याच्या घराबाहेर आंदोलनही केले. मात्र, तेंडुलकरने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सुरूच ठेवली. याच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे प्रकाश कापडे या सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने स्वतःचे जीवन संपवले, असे म्हणत आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकर यांचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच आता तरी जागा हो, असे म्हणत सचिन तेंडूलकरवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय घडलं होतं –
माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या अंगरक्षकाने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून कर्जबाजारी झाल्यामुळे पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून सचिन तेंडूलकरच्या या अंगरक्षकाने आत्महत्या केली होती. यानंतर एकच खळबळ उडाली. प्रकाश कापडे असे आत्महत्या केलेल्या या अंगरक्षकाचे नाव आहे. जामनेर येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रकाश कापडे याने प्रकाश गोविंदा कापडे याने शासकीय पिस्तूलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.
ऑनलाईन रमीच्या व्यसनातून कर्जबाजारी झाल्याने त्याने आत्महत्या केली, असे प्राथमिक कारण समोर आले आहे. त्याच्यावर कर्ज झाले होते. यामुळे त्याला घरही विकावे लागले होते. दरम्यान, ऑनलाइन रमीमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याने आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू –
“भारतरत्न असणाऱ्या सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करु नये म्हणून आम्ही खुप विनंती केली. प्रसंगी त्याच्या घराबाहेर आंदोलनही केले. परंतू तेंडुलकरने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सुरूच ठेवली. काल याच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे प्रकाश कापडे या सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने स्वतःचे जीवन संपवले. तेंडुलकरा तुझा निषेध असो! आतातरी जागा हो…” या शब्दात ट्विट करत आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.