चंद्रकांत दुसाने/मिलिंद वाणी, प्रतिनिधी
नागपूर – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी विधानसभेत बोलताना जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
काय म्हणाले आमदार चंद्रकांत सोनवणे –
यावेळी विधानसभेत बोलताना आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात चोपडा 132 केव्ही सबस्टेशनचे काम मंजूर झाले आहे. भुवनेश्वर इलेक्ट्रिक कंपनीने काम 1 एप्रिल 2022 रोजी त्यांना कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र, सदरचे काम अद्यापही सुरू नाही आणि हे काम सुरू करावे म्हणून माजी आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला. पण अद्यापही कंपनीने काम सुरू केलेले नाही.
कंत्राटदाराने 31 ऑक्टोबर 2023 रोजी हे काम करण्यास त्यांना व्यक्तीगत अडचणी आहेत, असं पत्र लिहिलंय. त्यामुळे हे काम रद्द करुन पुन्हा नवीन टेंडर काढण्यात यावे आणि हे काम लवकरात लवकर, सुरू करावे. आमच्या भागात वीजेचा दाब हा कमी प्रमाणात येतो. शेतकऱ्यांना अडचणी होत आहेत. पंपांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच त्यामुळे मोटरीही जळत आहेत.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडे हा जो पत्रव्यवहार झालेला आहे, हे कंत्राट रद्द करुन नवीन कंत्राटदार नेमण्यात यावा, तसेच त्यापद्धतीचे टेंडर काढण्यात यावे, अशी विनंती आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी यावेळी औचित्याच्या मुद्द्यावरुन सभागृहात केली.