चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 9 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवड्याचा आज तिसरा दिवस होता. यामध्ये नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेसंदर्भात बोलताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणी, शेतकरी तसेच व्यापारी बांधव यांच्या संदर्भात सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले ? –
यावेळी नगरविकास विभाग भाग क्रमांक 88 पान नंबर 55 च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेसंदर्भात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, आम्ही शहराला पाणीपुरवठ्याची योजना दिली की, रस्ते तोडावे लागतात. मलविस्तारणाची योजना दिल्यावरही रस्ते तोडावे लागतात. त्यानंतर आपण काँक्रिटीकरण करतो. त्यामुळे आपण या तिन्ही योजना मंजूर करताना एकाच वेळी मंजूर करण्याची विनंती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज विधानसभेत केली. तसेच या तिन्ही योजना एकाच वेळी मंजूर केल्यावर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे होणारे नुकसान ते याठिकाणी होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही पाणीपुरवठ्याची योजना घेतली की संपूर्ण शहरात तिचं काम होत आहे. मात्र, पाण्याचा साठा करण्यासाठी जे जलकुंभ देण्यात आले ते जलकुंभ 2011 च्या जनगणनेनुसार देण्यात आले. म्हणून आज संपूर्ण शहरात पाण्याचा साठा करण्याची व्यवस्था ती अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे हा जलकुंभ देताना आपण खऱ्या अर्थाने त्या मतदार यादीचा किंवा आताच्या लोकसंख्येचा विचार केला तर त्या पाण्याच्या टाकी, जलकुंभ आपल्या व्यवस्थित रित्या देता येतील, अशी विनंतीही त्यांनी याकडे सरकारकडे केली.
महापुरुषांचे पुतळ्यांबाबत मागणी –
माझ्या मतदारसंघात सर्व शहरातल्या जनतेची, ग्रामीण भागातील जनतेची या निमित्ताने विनंती आहे की, आपल्याकडे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. इतर ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. त्याला आपण तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंतीही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सरकारकडे केली.
नगरदेवळा आणि पिंपळगाव (हरेश्वर) या दोन गावांसाठी नगरपंचायतचा प्रस्ताव –
यासोबतच ते म्हणाले की, आज शहराकडे पाहून, इतर जी लहान लहान गावे आहेत, माझ्या मतदारसंघात पिंपळगाव (हरेश्वर) असेल किंवा नगरदेवळा असेल आता या नगर पंचायतीच्या बरोबरचे गावे त्याठिकाणी आहेत. आम्ही ही गावे नगरपंचायत करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि दुसऱ्या बाजुला ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. तर ग्रामपंचायतीची आचारसंहिता लागण्याआधी नगरदेवळा आणि पिंपळगाव (हरेश्वर) नगरपालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करावा अशी महत्त्वाची मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सरकारकडे केली.
व्यापाऱ्यांबाबत नेमकी मागणी काय? –
एका नगर पालिकेला एखाद्या शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये आमच्या व्यापारी बांधवांनी जर लिलावातून दुकान घेतले. तर त्याचे अग्रीमेंट तीन वर्षासाठी केले जाते. जेव्हा व्यापारी लाखो रुपयांचे दुकान घेतो, कोट्यवधी रुपयांचा माल त्यात भरतो. तर तुम्ही किमान 29 वर्षांचा करार करण्यात यावा. परंतु आपण धोरण बदलत नाही आणि फक्त 3 वर्षांचा करार त्याठिकाणी देतो. मी जळगाव महापालिकेकरिता तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे निर्णय झाला की, जळगाव महापालिकेची भाडेवाढ ही आठपट केलेली होती आणि आठपट करुन व्यापारी बांधवांवर अन्याय झाला होता. आपण त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला की, दोन पटीपेक्षा जास्त भाडेवाढ आपण घेऊ नये, अशा पद्धतीचा निर्णय झाल्यानंतरसुद्धा याठिकाणी तो कमी केला गेला नाही.
अधिवेशनात मांडला शेतकऱ्यांचा प्रश्न –
पाचोऱ्याहून तारखेड्याला जाणारा गेल्या 50 वर्षांपासूनचा रस्ता होता. परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तिसरी आणि चौथी सेंट्रल लाईन मंजूर केल्यानंतर तो संपूर्ण रस्ता या रेल्वेच्या लाईनमध्ये गेल्यामुळे आज जवळपास 25 गावांचा आणि 200 ते 250 शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, यावरही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महत्त्वाचे भाष्य केले.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराला चांगला निधी दिला आणि शहराला चांगले रुप देण्याचे काम दिले. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही अभिनंदन केले आणि पुरवणी मागण्यांवरील चर्चेसंदर्भात बोलताना त्यांनी नगरविकास विभागाला या सूचना दिल्या.