ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 सप्टेंबर : पाचोरा आणि भडगाव तालुक्यात आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका प्रांताधिकारी तसेच तहसीलदार पार पाडत असल्याची गौरवोद्गार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काढले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आज सकाळी पाचोरा तहसीलदार यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नवीन दालनातून तहसीलदारांच्या माध्यमातून गोर गरिब जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, नायब तहसीलदार विनोद कुमावत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील नागरिक तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
पाचोरा तहसीलदार यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, आजच्या स्थितीत तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांना प्रत्येक दिवशी अनेक प्रकरणांचा निपटारा करावा लागतो. केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनांमुळे त्यांचे दैनंदिन कामकाज व्यस्त असते. यासोबतच न्यायालयाचा दर्जा त्यांच्या कार्यालयाकडे असल्याने न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडे असते.
म्हणून कामकाजाचा मोठा ओढा त्यांच्याकडे असतो. अशावेळी जर त्यांच्या कार्यालयातील बसण्याची व्यवस्था तसेच आजूबाजूचा परिसर व्यवस्थित नसेल तर काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र, आज सुसज्ज अशा दालनाचं लोकार्पण होत असून तहसीलदार विजय बनसोडे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
‘…तोपर्यंत जनतेला न्याय मिळवून देता येत नाही!’ –
गेल्या 11 वर्षांपासून पाचोरा-भडगाव विधानसभेचे मी नेतृत्व करतोय. हे नेतृत्व करत असताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की, प्रत्येक विभागामध्ये एक चांगल्याप्रकारचे अधिकारी मिळाल्याचा लाभ झाला आणि यामुळे मी परमेश्वराचे आभार मानतो. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एक चांगल्या पद्धतीचे काम याठिकाणी केले असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शासन आणि प्रशासन जोपर्यंत एकत्रित येऊन काम करत नाहीत तोपर्यंत जनतेला न्याय मिळवून देता येत नाही. म्हणून शासन आणि प्रशासन यांची सांगड घालून जनतेल्या न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ठ केले.
शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणाबाबत आमदारांनी व्यक्त केली खंत –
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आपत्तीजनक परिस्थितीत अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाचोरा भडगाव तालुक्याला कधीही दाग लागला नाही. परंतु, दुर्दैवाने शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत काहींनी तो दाग लावण्याचं काम केलं. अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी असतील आम्ही अथक परिश्रम करत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता शेतकऱ्यांसाठी अनुदान आणण्याचे काम केले. मात्र, थोड्यासाठी तो आपल्याला डाग लागला असल्याची खंत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केली.
आमदारांनी केलं तहसीलादार विजय बनसोडंचं अभिनंदन –
दरम्यान, शेतकरी अनुदान लाटण्याचा प्रकरण थोडंसं लक्षात येताचं तहसलीदार विजय बनसोडे यांनी त्याचा उलगडा करत संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. अशावेळी तहसीलदार तसेच सर्व एकत्रित येऊन गुन्हेगारीला दडपण्याचे काम कसं करता येईल, असा प्रयत्न करतात. अशा घटना देखील यापुर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. मात्र, हा प्रकार लक्षात आल्याबरोबरच त्यांनी या प्रकरणाला आळा घालण्याचं काम तहसीलदार विजय बनसोडे यांनी केल्यामुळे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
प्रांताधिकारी भूषण अहिरे काय म्हणाले? –
ज्या-ज्या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी तसेच राजकीय नेत्यांचे ट्युनिंग व्यवस्थित असतं त्याठिकाणी अडचणी तसेच तक्रारीही कमी असता आणि कामेही चांगल्या प्रकारे होत असतात. ज्या-ज्यावेळी अडचणी आल्या त्या-त्यावेळेस अधिकारी वर्गाच्या पाठीशी आमदार खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यात चांगल्या पद्धतीचे कामे होतं आहेत. दरम्यान, तहसील कार्यालय म्हटलं की, साधारणतः 500 ते 1000 लोकांचा दैनंदिन वावर याठिकाणी असतो. अशातच नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनामुळे तहसीलदार देखील चांगल्या पद्धतीने लोकांचं काम करतील, अशा शुभेच्छा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी दिल्या.
तहसीलदार विजय बनसोडे काय म्हणाले? –
तहसीलदार विजय बनसोडे म्हणाले की, पाचोरा येथील तहसील कार्यालयात रूजू होऊन ऑगस्ट 2025 मध्ये एक वर्ष पुर्ण झालं. गेल्या एका वर्षांत आमदारांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या बाबींवर काम केलं गेलं. यामध्ये तहसीलदार यांचे दालन हे कामकाजाच्या दृष्टीकोनातून छोटं पडत होतं. ही बाब मी त्यांच्यापर्यंत पोहचवली आणि त्यांनी देखील डीपीसीच्या माध्यामातून त्याची पूर्तता केली आणि आज उत्कृष्ट अशा दालनांचं लोकार्पण झालं.
दरम्यान, आमदार महोदयांच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झालं यामुळे नूतनीकरणाचं श्रेय त्यांना जातं. यासोबतच तहसीलदारांच्या दालनाचं बांधकाम तसेच जी दुरूस्ती झालीय त्याचे श्रेय सार्वजिनक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रीनिवास काजवे तसेच इतर अधिकारी यांना देखील जात असल्याचे विजय बनसोडे यांनी सांगितले.