चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 15 जुलै : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिथे 1 जागा रिक्त असेल तिथे 10 लोकांना पाठवतो आणि या 10 लोकांना (उमेदवार) पाठवल्यावर पुन्हा त्या संस्था चालकाला लूट करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे, असे म्हणत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज संताप व्यक्त केला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असून आज लक्षवेधी दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील शिक्षक भरतीप्रकरणी संताप व्यक्त करत सरकारकडे महत्त्वाची मागणी केली.
पवित्र पोर्टलमुळे केले सरकारचे अभिनंदन –
या राज्यात डीएड, बीएड झालेल्या होतकरु विद्यार्थ्याची जी लूट होत होती, ती बंद करुन पवित्र पोर्टल याठिकाणी सुरू करण्यात आलं, याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सरकारचे अभिनंदन केले. या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खरा गुणवान विद्यार्थ्याला ज्याठिकाणी जागा रिक्त असेल त्याठिकाणी पाठवलं जातं, असेही ते यावेळी म्हणाले.
आमदार किशोर आप्पा पाटील संतापले –
जिथे 1 जागा रिक्त असेल तिथे 10 लोकांना पाठवतो आणि या 10 लोकांना (उमेदवार) पाठवल्यावर पुन्हा त्या संस्था चालकाला लूट करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे, असे म्हणत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी संताप व्यक्त केला.
आज जर 10 लोक पाठवले तर 10 लोकांची मुलाखत घेतली जाते आणि त्या मुलाखतीमध्ये जो जास्त पैसे देईल, त्या उमेदवार शिक्षकाला त्याठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नोकरी दिली जाते. म्हणून ज्या संस्थेमध्ये जितक्या जागा रिक्त असतील तितकेच उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थाला आपण नोकरी द्यावी, अशी मागणी करत ती आपण द्याल का, असा सवाल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना केला.
काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मागणीवर शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की, आमदार किशोर आप्पांनी जो काही मुद्दा उपस्थि केला आहे, शिक्षकांची भरती गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शकपणे झाली आहे, या भावनेतून पवित्र पोर्टल ही प्रणाली काही वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने यापूर्वी 19 हजार शिक्षकांची भरती संपन्न झाली आहे आणि आता 10 हजार शिक्षक बांधवांची भरती याठिकाणी प्रगतीपथावर आहे. आपण जर पाहिलं तर शासकीय ज्या काही शाळा आहेत, त्याठिकाणी विनामुलाखत थेट नियुक्ती केली जाते. ज्या संस्था विनामुलाखत शिक्षकांची अपेक्षा ठेवतात, त्याठिकाणी शिक्षक भरती केल्या जातात. आपण जो काही मुद्दा याठिकाणी उपस्थित केला आहे, त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यावर जात असताना अनेक सदस्यांच्या सूचना आल्या आहेत. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करुन पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये आणखी काय चांगल्या सुधारणा करता येतील, यादृष्टीने शिक्षण विभाग काम करेल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिले.






