जळगाव, 4 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तांत्रिक कारण पुढे करून आपला उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला असला, तरी यामागे राजकीय दबाव आणि काही ‘अदृश्य शक्तींचा’ हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अर्ज बाद झाल्याची माहिती मिळताच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
नेमकं काय घडलं? –
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, २ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था व संयुक्त शेती सहकारी संस्था, पाचोरा तालुका मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुमित किशोर पाटील यांचे सर्व नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी नामंजूर केले.
हरकतीनंतर अर्ज नामंजूर –
सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली होती. बँकेच्या पोटनियम क्रमांक ३५ (अ) (५) नुसार, उमेदवार ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व करतो, त्या संस्थेचा निवडणुकीच्या लगतच्या वर्षातील ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ असणे आवश्यक आहे. संबंधित संस्था या निकषात पात्र ठरत नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुमित पाटील यांचे अर्ज नामंजूर केले.
‘अदृश्य शक्तींच्या’ दबावातून निर्णय; सुमित पाटील यांचा आरोप –
उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे समजताच सुमित पाटील यांनी जिल्हा बँकेत जाऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्ज नामंजूर करण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राजकीय दबावातून आणि अदृश्य शक्तींच्या सांगण्यावरून माझा अर्ज बाद करण्यात आला,’ असा थेट आरोप त्यांनी केला.
विशेष म्हणजे, अर्ज नामंजूर केल्यानंतर आपल्याला योग्य स्पष्टीकरण देण्यात आले नाही. उलट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय बंद करून निघून गेल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमित पाटील यांनी हा निर्णय आपण सहजासहजी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत, या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यात या प्रकाराला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सुमित पाटील यांच्या याचिकेवर काय भूमिका घेतली जाते, याकडे जिल्हा बँकेच्या निवडणूक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सतिश शिंदे यांचाच एकमेव वैध अर्ज शिल्लक –
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केल्यामुळे पाचोरा मतदारसंघात केवळ भाजपच्या सतीश शिंदे यांचाच एकमेव वैध अर्ज शिल्लक राहिला असून, ही बिनविरोध निवड टिकणार की न्यायालयीन लढाईनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






