जळगाव, 4 नोव्हेंबर: युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत, जळगाव यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ‘विकसित भारत युवा संवाद – Know Your Vote’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभरातील ५०० विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात २५० हून अधिक विद्यार्थी व युवकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला जळगावच्या खासदार श्रीमती स्मीता वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोते, उपअधिष्ठाता डॉ. उमेश लाड, डॉ. विलास माळकर, हर्षल सिखवाल तसेच मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे उपस्थित होते.

कार्यक्रमात युवा आयकॉन कुमुदिनी झा यांनी ‘Know Your Vote’ या विषयावर सादरीकरण (PPT) केले. यामध्ये भारत निवडणूक आयोग (ECI), मतदानाचे महत्त्व, मतदारांची भूमिका, निवडणूक प्रक्रिया तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी युवकांमध्ये मतदान व लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. युवकांना मार्गदर्शन करताना खासदार स्मीता वाघ यांनी विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे खासदार स्मिता वाघ यांच्यासोबत विद्यार्थ्यांचा झालेला थेट संवाद होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी शासनव्यवस्थेतील युवकांचा सहभाग, नागरिकांची कर्तव्ये, लोकशाहीतील जबाबदारी आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांची भूमिका यासंबंधी प्रश्न विचारून आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार स्मीता वाघ यांनी SIR प्रक्रियेची माहिती युवकांनी समजून घेणे तसेच आपल्या सहकारी विद्यार्थी व मित्रपरिवारामध्ये याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करणारे शरद हटकर यांचा त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्वा काळे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप लोकशाहीची शपथ घेऊन करण्यात आला. यावेळी उपस्थित २५० हून अधिक युवकांनी लोकशाही मूल्यांचे पालन, जागरूक मतदान आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विलास मालकर यांनी केले. युवकांना लोकशाही संस्था आणि लोकप्रतिनिधींशी जोडण्याच्या माध्यमातून विकसित भारत युवा संवाद हा उपक्रम युवकांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करीत आहे. युवा शक्तीला राष्ट्रनिर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवून युवकांच्या कल्पना, आकांक्षा आणि सामाजिक जबाबदारीचे रूपांतर विकसित भारत २०४७ च्या संकल्पपूर्तीसाठी अर्थपूर्ण योगदानामध्ये करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा: “राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील






