चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 4 जुलै : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2025 सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा पहिल्या आठवड्यातील आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज 9.45 ते 10.15 वाजेच्या दरम्यान विधानसभेच्या सभागृहाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्ष्यवेधी सूचना मांडण्यात आल्या. यावेळी आमदार संजय मेश्राम तसेच किशोर आप्पा पाटील यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून पाहिले कामकाज –
राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह एकूण 9 विधानसभा सदस्यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर किशोर आप्पा पाटील यांनी आज पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.
गुटखा विक्री-तस्करीबाबत लक्ष्यवेधी सूचना –
राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी तसेच विक्री होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अन्नपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी घेण्यास नकार दिल्यामुळे पुराव्यांअभावी पोलिसांकडून गुन्हे नोंदवले जात नाहीत. प्रशासनाच्या अशा चुकीच्या निर्णयांमुळे राज्यात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढत चालले असून यावर खटले चालवले जात नाहीत. सरकारकडून विक्रेत्यांना अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याने जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण पसरलेले आहे. राज्यात गुटखा बंदीसाठी शासनाकडून कडक कारवाई करण्याची आवश्यकता असून त्याबाबत शासनाने कारवाई करावी, अशा आशयाची लक्ष्यवेधी सूचना मांडण्यात आल्या.
मनोज घोरपडे, श्वेता महाले, विक्रम पाचपुते, प्रविण दटके, रमेश बोरनारे, मुरजी (काका) पटेल, मनिषा चौधरी, कृष्णा खोपडे, नारायण कुचे, अनंत नर, आदी विधानसभा सदस्यांनी मांडली. यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काम पाहिले. गुटखा विक्री-तस्करीबाबत लक्ष्यवेधी सूचना लक्षात घेत योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले.
मंत्र्यांनी ‘अशा’ पद्धतीने उत्तर द्यावे – तालिका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील
गुटखा तस्करी-विक्रीबाबतच्या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घ्यावी. तसेच सदस्यांची तीव्रता पाहून ज्या अधिकाऱ्याच्या क्षेत्रामध्ये गुटखा तस्करी होत असेल तर त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची अथवा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार का? अशापद्धतीने सदस्यांना उत्तर द्यावे, असे तालिका अध्यक्ष म्हणून किशोर आप्पा पाटील यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना सांगितले.