चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अमरावती, 30 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अमरावतीतून दुहेरी हत्यांकाडाची हादरवाणारी घटना समोर आली आहे. जागेच्या वादातून शेजाऱ्याने आई व मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील मंगलधाम कॉलनी परिसरात असणाऱ्या बालाजी नगरात काल सायंकाळी घडली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
अमरावती शहरातील मंगलधाम कॉलनी परिसरात असणाऱ्या बालाजी नगरात शेजाऱ्यांमध्ये घरालगत असणाऱ्या खुल्या जागेवरुन वाद निर्माण झाला होता. दरम्यान, रोजच्या होणाऱ्या या वादातून सोमवारी सायंकाळी आई आणि मुलाची लोखंडी सब्बलने (कोयता) वार करुन खून करण्यात आला. कुंदा देशमुख (वय 65) आणि सुरज देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर देवानंद लोणारे, असे दुहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, हा आरोपी फरार असल्याचे कळते.
काय होता नेमका वाद –
अमरावतीतील मंगलधाम कॉलनी परिसरात बालाजी नगर येथे विजय देशमुख हे पत्नी कुंदा आणि मुलगा सुरज यांच्यासोबत राहतात. व त्यांचा मुलगा सुरज देशमुख हा एमआयडीसीत कामाला आहे. त्यांच्या शेजारी मोबाईलचा व्यवसाय करणारे देवानंद लोणारे हे राहत होते. दरम्यान, देशमुख आणि लोणारे कुटुंबामध्ये गत अनेक दिवसांपासून त्यांच्या घरालगत असणाऱ्या खुल्या जागेवरून वाद निर्माण झाला. या वादातूनच सोमवारी, सायंकाळी पाच वाजता सुरज देशमुख हा एमआयडीसीतून कामावरून घरी परतला असताना देवानंद लोणारे यांनी त्याच्यासोबत वाद घातला.
आरोपीने केला तिघांवर हल्ला –
देवानंद लोणारे आणि सुरज देशमुख यांच्या वादाने टोकाचे रूप धारण केले. परिणामी देवानंद लोणारे याच्या हल्ल्यात सुरज देशमुख गंभीर जखमी झाला असताना त्याचा आवाज ऐकून त्याची आई कुंदा देशमुख या घराबाहेर आल्या. यावेळी देवानंद लोणारे याने कुंदा देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी सब्बलने वार केला. दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले.
आई व मुलाचा मृत्यू –
कुंदा देशमुख आणि सुरज देशमुख रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना घरात असणारे कुंदा देशमुख ह्यांचे पती विजय देशमुख घराबाहेर आरडाओरड ऐकून बाहेर आले. त्यावेळी देवानंद लोणारे याने विजय देशमुख यांच्यावर देखील वार केला. दरम्यान, या हल्ल्यात विजय देशमुख जखमी झाले. या घटनेबाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून आले असता पोलिसांनी तिघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कुंदा देशमुख आणि सुरेश देशमुख यांना मृत घोषित केले.
आरोपी घटनास्थळावरून फरार –
अमरावतीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आपली पत्नी आणि मुलासह दुचाकीवर घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत फरार आरोपी देवानंद लोणारे याचा शोध सुरू केला आहे. अमरावतीचे पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त कैलास फुंडकर यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा आढावा घेतला.
हेही वाचा : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार?