नंदुरबार, 26 फेब्रुवारी : जर मनात जिद्द असेल तर आई वडील उच्च शिक्षित नसतानाही मुले जिद्दीने आपले करिअर घडवू शकतात, हे नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणीने सिद्ध करुन दाखवले आहे. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील मुबारकपूरच्या एका शेतकऱ्याच्या मुलीने एम. फार्मसी (फार्माकॉगनासी) या विषयात विद्यापीठात सुवर्णपदक पटकावत स्वत:ला सिद्ध केलंय. मेघा पवार असे या तरुणीचे नाव आहे.
मेघा पवार हिने आर. सी. पटेल कॉलेज शिरपूर येथून तिने एम. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. यावेळी दीक्षांत समारंभात ती सुवर्णपदक घेण्यासाठी आई-वडिलांसह आली होती. यावेळी तिला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
मेघा ही नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील रहिवासी आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मेघाचे प्राथमिक शिक्षण झाले. तिच्या आईचे शालेय शिक्षण झालेले नाही. तर तिचे वडील गणेश पवार दहावी शिकले असून शेती व्यवसाय करतात.
मेघा पवार हिने “सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत बोलताना सांगितले की, मला शिक्षणाची प्रेरणा ही आई वडिलांपासून मिळाली. घरात माझ्या लग्नाचा विचार सुरू होता. पण मी आई वडिलांना म्हटले की, मला शिकू द्या. त्यांनी माझे म्हणणे ऐकून मला पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मला स्वत:ला सिद्ध करुन दाखवायचे होते.
तसेच माझ्या वडिलांना परिवाराच्या जबाबदारीमुळे जास्त शिकता नाही आले. त्यामुळे मला आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे माध्यम वाटले. घरात मोठी असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी होती. मी जर शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी गेले, तर त्याचे प्रतिबिंब घरातील लहान भावंडांवर पडणार होते, असेही ती म्हणाली.
माहितीचा अभाव –
मेघा पवार म्हणाली की, आमच्या भागातील अनेकांना शासनाकडून शिक्षणासाठी दिल्या सवलतींबाबत माहिती नाही. अनेकांना असे वाटते की, उच्च शिक्षणासाठी खूप पैसे लागतात. त्यामुळे मुलांना 10-12वीच्या पुढे नाही शिकवले जात. आपल्याला सरकारडून शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप मिळते, त्याच्यावर शिक्षण करता येते, याबाबत त्या लोकांना माहिती नाही. मी स्वत: अनेक जणांना गाईड केलंय. त्यामुळे याबाबत जनजागृती होणं गरजेचे आहे, असे मत तिने “सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत बोलताना व्यक्त केले.
SPECIAL STORY : वायरमनचा मुलगा बनला न्यायाधीश, भुसावळच्या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास
भविष्यात पीएचडी करायची आहे –
आर. सी. पटेल कॉलेचमधून एम. फार्मसीचे शिक्षण घेतल्यानंतर सध्या मेघा ही गुजरातमधील अहमदाबाद येथील फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. भविष्यात मेघाला पीएचडी करायचे आहे. तसेच ड्रग इन्स्पेक्टर व्हायचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.