मुंबई, 22 ऑक्टोबर: लॉरेन्स बिश्नोई गँगकडून कलाकारांनंतर राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले जात असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या दाव्याला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी समर्थन दिले आहे. गुजरातच्या कारागृहात असलेल्या बिश्नोई गँगकडून कारवाया सुरू असल्याचा आरोप करत देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. तसेच, अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित अलीकडील घटनेवर सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून भाजप सरकारवर टीका करताना नाना पटोले म्हणाले की, गुजरातच्या कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईकडून कथितपणे कारवाया सुरू असताना सरकार काय करत आहे? देश आणि गुजरातमध्ये एकाच पक्षाची सत्ता असतानाही या प्रकारांना आळा का घातला जात नाही? देशाचे गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना या प्रकरणाची माहिती नाही का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
अधिवेशनाच्या काळात अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनाही बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा मुद्दा आपण विधानसभेत उपस्थित केला होता, असे पटोले यांनी सांगितले. टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित अलीकडील घटनेचाही उल्लेख करत महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकार यांच्यात कुठेतरी त्रिकोण असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील वस्तुस्थिती सरकार आणि प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पटोलेंची जयकुमार गोरे यांच्यावरही टीका –
राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानावर टीका करताना त्यांचा अभ्यास कमी असल्याचा टोला त्यांनी लगावला. अमेरिका आणि चीनच्या दबावाखाली केंद्रातील भाजप सरकार काम करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
भारताला अस्थिर करण्यासाठी परदेशी शक्तींचा वापर केला जात असून आंदोलनात सहभागी होणाऱ्या युवकांना दररोज तीन हजार रुपये दिले जात असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी आंदोलक तरुण पैशांसाठी नव्हे, तर देशाच्या रक्षणासाठी आणि संविधानासाठी लढत असल्याचे म्हटले. भाजपकडून आंदोलनाबाबत जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा: पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन






