पाचोरा, 9 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील पोलीस पाटील किरण वसंत तावडे (वय 46) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने तावडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाचोरा तालुका पोलीस पाटील संघटनेमार्फत तावडे कुटुंबियांस आर्थिक मदत करण्यात आली. एकूण 52 हजार750 रूपयांची मदत त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आली असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस पाटील संघटनेने दिला मदतीचा हात –
नांद्रा येथील पोलीस पाटील कै. किरण वसंत तावडे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा मानसिक आघात झाला. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना मनोबल आणि धैर्य देण्यासाठी तसेच एक छोटीशी आर्थिक मदत म्हणून पाचोरा पोलीस पाटील संघटनेतर्फे पाचोरा तालुक्यातील सर्व गावांतील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने एकूण 52 हजार750 रूपयांची मदत देण्यात आली. या मदतीमुळे तावडे परिवाराला भावनिक आधारासोबतच थोडासा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, भविष्यात पाचोरा तालुक्यातील कोणत्याही पोलीस पाटील कुटुंबावर अशा प्रकारचे दुर्दैवी संकट आले, तर संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा निर्धार गावकामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सदस्य तथा माजी जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी आणि पाचोरा तालुका अध्यक्ष भगवान पवार यांनी व्यक्त केला.
याबरोबरच संघटनेमार्फत भविष्यातही प्रत्येक पोलीस पाटील यांचे विमा काढून घेण्याचे व शासन दरबारीही त्या संदर्भात शासनाकडूनही संपूर्ण पोलीस पाटील यांना विमा लागू करण्यातचे धोरणावर चर्चा करणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील यांनी या ठिकाणी आर्थिक मदत देऊन आपलं सामाजिक ऋण या निमित्ताने व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी पाचोरा तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे प्रतिनिधी म्हणून पंजाबराव पाटील (लासगाव), किरण पाटील (आसनखेडा), भूषण पाटील (आसनखेडा), भूषण सोळुंके (बांबरूड), चेतन पाटील (घुसर्डी), श्रीकांत पाटील (भोरटेक), योगेश पाटील (वेरूळी), विनोद पाटील (संगमेश्वर), विजय ठाकरे (परधाडे), राहुल खैरनार (भातखंडे), मुकेश अहिरे (खाजोळा), राजू पाटील (माहेजी), राहुल देशमुख (सारोळा), प्रताप ठाकरे (चिंचखेडा), विनोद सयाजी (गाळण), समाधान पाटील (वडगाव), तुकाराम तेली (खडकदेवळा) यांची उपस्थिती होती.






