मुंबई, 7 मार्च 2025 : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. यामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदेशीर असणाऱ्या नार पार पार गिरणा प्रकल्पाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षात आपण राज्यात सिंचनाच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. जवळपास 160 प्रकल्पांना आपण फेरप्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्प आपण वेगाने पूर्ण करत आहोत. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी एकीकडे जलसंधारणांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण अंमलात आणली. त्यासोबत राज्यात अतिशय महत्त्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातात घेतले आहेत. यामध्ये नार पार गिरणा या प्रकल्पाचे टेंडर काढण्यात आले आहे. यातूनही मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
हेही वाचा – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पाच महिन्यांची मिळाली मुदतवाढ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा नेमकी काय?
काय आहे नारपार गिरणा प्रकल्प –
गेल्या अनेक दिवसांपासून नार पार गिरणा संदर्भात खान्देशातील राजकारण पेटले आहे. नार – पार गिरणा खोरे समृद्ध व्हावे याकरिता माजी खासदार उन्मेश पाटील यांनीही गिरणा नदीत आंदोलनही केले आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही नार-पार गिरणा योजना आहे. यासाठी साधारणपणे 7 हजारांहून अधिक कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा तसेच मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
धुळे जिल्ह्यात देखील काही भागांत याचा लाभ होणार आहे. नार-पार गिरणा प्रकल्पामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. दरम्यान, या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून या योजनेला मंजूर मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नार-पारची आशा लागली आहे.