पाचोरा, 16 मार्च : जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
लोहारी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश –
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोहारा येथील उद्योजक राहुल कटारिया, माजी सरपंच पती शांताराम चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत विजय चौधरी, मनोज सोनार, विजय जैन, बालू माळी, यशवंत शेळके, रवि पाटील, फकिरा चौधरी, प्रकाश चौधरी, नितीन चिंचोले, दीपक बोरसे, रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी, संतोष सोनवणे (अहिरे), शिवदास चौधरी, विलास धनगर, शानु शहा, आप्पा राठोड, कैलास माणिक जाधव यांनीही भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राहुल कटारिया यांनी सांगितले की, लोहारा गावाचे विकासासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करीत राहू. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. तसेच भाजप पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावात हा प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा हा भाजपला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.