पुणे, 3 जानेवारी : नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नागपूर, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला. या निवडणुकीच्या निकालावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले अजित पवार? –
नागपूर आणि अमरावतीमधील निकाल हा सत्ताधारी पक्षाला धक्कादायक निकाल आहे. त्यामुळे महाविकास आघाडी इथुन पुढच्या काळामध्ये विचारपूर्वक उमेदवार देण्याकरता आणि समंजस भूमिका सर्वच वरिष्ठांनी दाखवली, तर येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये या निकालावरुन निर्माण झाली आहे. आमच्या विरोधकांच्या आणि आताच्या सत्ताधारांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निकाल आहे. जर फार कोणी तोडाफोडीचं राजकारण केलं तर ते महाराष्ट्राला आवडत नाही, हे सर्वसामान्य जनतेने अजून सांगितलं नाही पण शिक्षक आणि पदवीधरांनी नक्कीच सांगितलंय, असं मला वाटतं. ते एका मुलाखतीत बोलत होते.
तसेच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी समंजस भूमिका दाखवली. काही कारणानिमित्त बाहेर फिरता येत नव्हतं, लॉकडाऊन होतं किंवा बंधनं होती, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पंतप्रधान, आरोग्यमंत्री तसेच इतर प्रशासन वर्गाशी संपर्क साधून कामकाज केलं. परंतु नंतर ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं, ज्याप्रकारचं गलिच्छ राजकारण झालं, म्हणजे सांगताना असं सांगितलं गेलं की, आमचा याच्याशी दुरान्वयेदेखील संबंध नाही. आम्ही पाहतोय, त्यांच्यातल्या त्यांच्यातच वाद आहे. आणि नंतर मात्र, 15-3 आठवड्यातच सांगितलं की, मी अमक्याला फोन करुन सुरतला पाठवलं. मी तमक्याला फोन करुन गुवाहटीला पाठवलं.
हे जे काही राजकारण आहे, लोकशाहीमध्ये दिलदारपणे विरोधकांशीपण वागलं पाहिजे आणि विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांशी वागलं पाहिजे, ही जी महाराष्ट्राची परंपरा आहे, या परंपरेला पूर्णपणे बाजूला करुन तिला चक्काकूर केली. हे तोडाफोडीचं राजकारण पक्षांतर बंदी कायदे आणले, नियम केले, परंतु त्यालाही तिलांजली देण्याचं काम झालं.
आजपण निवडणूक आयोगपण सारखी तारीख पे तारीख देतंय. सर्वोच्च न्यायालयाबाबत आपल्या सारख्यांनी काही टिपा टिप्पणी करणं योग्य नाही. पण तिथंही तारखाच पडतात. वास्तविक एवढा मोठा तुमचा माझा भारत देश आहे. 130 ते 135 कोटी पर्यंत आपली लोकसंख्या गेली आहे. आणि अशा वेळी ज्याप्रकारे हे जे काही तोडफोड केली जाते. स्थिरता ठेवली जात नाही. एकदा निवडणूक झाल्यानंतर मतदार राजाने ज्यांना निवडून दिलंय त्यांनी व्यवस्थितपणे आपलं आपलं काम करत राहावं, विरोधकांनी विरोधकांची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडावी.
परंतु आम्ही विरोधी पक्षात कधी बसणारच नाही. आम्ही तोडफोड करू, सरकार पाडू हे जे मधल्या काळामध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात घडलेलं लोकांनी पाहिलंय, हे जनतेला आवडलेलं दिसत नाही, हे आताच्या निकालावरुन आपल्याला बोध घ्यायला हरकत नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.