धुळे, 15 सप्टेंबर : आज लोकांना अनेक समस्या आहेत. महागाई सारखे ही संकट आहे. बेकारीचं संकट आहे. आजचं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही पावलं टाकत नाही. आजचं सरकार भगिनींना प्रपंच चालवायला, महागाईतून सुटका करायला जे करायला हवं त्यासाठी उपाययोजना करत नाही. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी मिळेल त्यावेळेस त्यांच्या हातातून काढून घेणे आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणे हे ऐतिहासिक काम तुम्हाला करायचा आहे. मी तुम्हाला शब्द देतो हे राज्य तुम्ही आमच्या हातामध्ये द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, ह्या कामाला तुमची साथ मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले.
काय म्हणाले शरद पवार –
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, आज बऱ्याच वर्षांनी तुम्हा सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. भर सकाळी शेतीवाडीची काम असताना सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. शिंदखेडा हा परिसर कष्टकरी शेतकऱ्यांचा परिसर आहे. काळ्या आईची सेवा करायची, उत्पादन मिळवायचं, संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची महत्त्वाची कामगिरी करायची हे काम आमचा शेतकरी राजा सतत करत असतो.
अलीकडच्या काळात जे राज्यकर्ते आहेत त्यांना शेतीसंबंधी यंकिंचितही आस्था नाही. त्यांची अशी अनेक धोरणं सांगता येतील जी धोरणं शेतकरी हिताची नाहीत. आजच्या भाषणांमध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा एका दृष्टीने जिरायत शेतकऱ्याचे पीक, सामान्य माणसाचं खाद्य. तुम्ही पिकवलेला कांदा मग तो धुळे जिल्ह्यातला असेल, नाशिकचा असेल, पुणे जिल्ह्यातला असेल, सातारा जिल्ह्यातला असेल त्या कांदा उत्पादकाला अधिकचे दोन पैसे मिळायला पाहिजेत ही तुमची मागणी रास्त आहे. तो काय मोठा बागायतदार नाही. कांदा पिकवतो, त्या कांद्याला जगाची बाजारपेठ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींचे सरकार आलं आणि कांद्याच्या निर्यातीला बंदी घातली म्हणजे ज्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतलं, दोन पैसे मिळतील म्हणून जगात पाठवायचा निकाल घेतला तर त्याच्यावर बंदी. आपल्या राज्यात काही भागांमध्ये उसाचे पीक घेतलं जातं. आज हिंदुस्थानामध्ये दोन नंबरचा उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं.
उसापासूनपासून साखरनिर्मिती होते, मळीपासून इथेनॉल होतं आणि अन्य पदार्थापासून वीज तयार करता येते आणि मग शेतकऱ्याला उसाची किंमत ज्यादा देता येते. मोदी सरकार आलं आणि ज्या शेतकऱ्यांनी उसातून विविध पूरक उत्पादनं घ्यायचं ठरवलं त्यावर बंधन घातली. त्यावर मर्यादा घातल्या. गहू-तांदूळ हे महाराष्ट्रात, देशात महत्त्वाचं पीक. मोदी सरकारने त्याच्यावरही बंधनं घातली. जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे. म्हणून आम्ही सांगतो हे मोदी सरकार बळीराजाविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज –
यासोबतच ते म्हणाले की, 10 वर्ष शेती खात्याचा कारभार मी स्वतः सांभाळला. मी ज्यावेळी शेती खात्याचा काम हाती घेतलं, शपथ घेतली तेव्हा पहिलं काम माझ्याकडे आलं ते म्हणजे अमेरिकेतून गहू आणायचा, परदेशातून तांदूळ आणायचा. मला दुःख झालं. एका शेतकऱ्यांच्या कुटुंबात माझा जन्म झाला. माझेही आई वडील शेती करत होते. हा देश बळीराजांचा देश आहे आणि या देशातल्या सामान्य माणसाला दोन वेळचं गहू तांदुळांचा सारखं अन्नधान्य हे परदेशातून आणायचं? ही गोष्ट आपल्याला शोभणारी नाही आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं. गव्हाची, तांदळाची उत्पादकता आणि किंमत वाढवली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की, जो देश गहू आयात करत होता तो देश 2014 ला जेव्हा मी त्या खात्याचा काम सोडून दिलं तेव्हा तुम्हा लोकांच्या मदतीने जगातला 2 नंबरचा गहू निर्यात करणारा देश भारत झाला. आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले. जो देश परदेशातून तांदूळ आणत होता तो देश जगामध्ये एक नंबरचा तांदूळ पिकवणारा देश झाला. हे तुम्हा लोकांच्या कष्टामुळेच शक्य झालं.
यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाच्या बोज्यामुळे आत्महत्या केली आणि मी अस्वस्थ झालो. तेव्हा दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आग्रह केला आणि 71 हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याचा निकाल घेतला. जे कर्ज घेतात आणि वेळेवर फेडतात त्यांना जी 14% – 12% व्याजाचा दर होता तो 6% – 4% पर्यंत आणला, फक्त नियमित परत करणे ही अट घातली आणि कमी व्याजामध्ये कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. शेतीमालाला किंमत दिली आणि आज जगातला शेती उत्पादन वाढवणारा महत्त्वाचा देश तुमचा-माझा भारत देश आहे.
लढाई आमदारकीची : शरद पवार की अजित पवार?, पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची स्फोटक मुलाखत
शिंदखेडला आल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या, माझे सहकारी संदीप बेडसे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनीही काही बाबी माझ्या कानावर घातल्या. हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय, इथे गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना 20-20 वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता ती लोकांवर खटले भर, त्यांना तुरुंगात टाक, त्यांना त्रास दे, सत्तेचा गैरवापर कर म्हणून वापरली जात आहे. हेमंत देशमुखांसारखा माझा एक सहकारी, एक प्रामाणिक माजी मंत्री की जो तुम्हा लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी पडेल ते कष्ट करतो त्यांच्यावर खोटे खटले भरले. जे तुमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्या हेमंत देशमुखांना अटक केली जाते, तुरुंगात टाकला जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, याचा एक चमत्कारिक उदाहरण या तालुकामध्ये बघायला मिळतं.