नवी दिल्ली, 19 जानेवारी : केंद्र सरकारने गुरुवारी कोचिंग क्लासेसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खासगी कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
काय आहे हा नवीन नियम? –
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस (शिकवणी वर्ग) प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जाईल, असे सरकारने म्हटले आहे. याशिवाय कोचिंग इन्स्टिट्यूटची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते. एवढेच नाही, तर त्यांना आता चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासनेही देता येणार नाहीत.
सूचनांचे पालन करावे लागेल –
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोचिंग संस्था अनेक गैरवर्तन किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकणार नाहीत. कोचिंग संस्थांना नोंदणीसाठी सर्व सूचनांचे पालन करावे लागेल. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एका कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
नव्याने जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे –
- 16 वर्षांखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही
- कोचिंग संस्थां चांगले गुण वा रँकची आश्वासने देऊ शकत नाहीत..
- कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी.
- गुणवत्ता, सुविधा किंवा निकालांबद्दल कोणताही दावा करणारी जाहिरात स्वतः प्रकाशित करू शकत नाहीत किंवा अशा प्रकाशनात भाग घेऊ शकत नाहीत.
- कोचिंग संस्थांना नैतिक अधःपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविलेल्या व्यक्तींना शिक्षक किंवा अन्य पदांवर नियुक्त करता येणार नाही.
- विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि तर्कसंगत असावे, शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात.
- विद्यार्थ्याने मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे.
- कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही.
- मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रूपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्दची सूचना
हेही वाचा : MPSC : राज्य सेवा मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यातून पहिला तर पूजा वंजारी मुलींमधून पहिली