मुंबई, 25 डिसेंबर : नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल दिले.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्नपदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर, तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली जाईल. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार व प्रोत्साहन –
उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, तर राज्य स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जेजुरी येथील भंडाऱ्याचा 2,200 किलोचा स्टॉक जप्त –
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवाच्या वेळी भंडाऱ्याचा भडाका उडाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. भंडारा पेट घेत नसतो सदर आगीसाठी तेल अथवा इतर काही कारण असू शकते. या प्रकरणी औषध निरीक्षक व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. यावेळी पिशव्यांमध्ये साठवलेला २,२०० किलो भंडाऱ्याचा साठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये हळद आढळून आली आहे. सदर साठा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.






