चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अहमदनगर, 29 मार्च : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आमदारकीचा राजीनामा दिला. शरद पवार गटाकडून खासदार सुजय विखे यांच्याविरोधात ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
मला माफ करा –
निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद साधला. ते म्हणाले की, मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके त्यांनी राजीनामा दिला.
शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवणार –
आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. दरम्यान, लंके यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांनी आता शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला. राज्यातील कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखेंविरोधात ते उभे राहणार आहेत.
जीवन मरणाची निवडणूक –
निलेश लंके पुढे म्हणाले की, स्व:इच्छेने सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यासाठी ही निवडणूक जीवन मरणाची निवडणूक असून ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे आहेत पण आमच्याकडे माणसे आहेत. तुमचे हॉस्पिटल चालले पाहिजे म्हणून तुम्ही सरकारी रुग्णालयासाठी त्यांनी काहीही केले नाही, अशी टीका त्यांनी विखे कुटुंबावर केली.
हेही वाचा : नवनीत राणांच्या विरोधात प्रहारकडून बड्या नेत्याला मिळाली उमेदवारी, बच्चू कडूंची महायुतीविरोधातील खेळी