मुंबई, 30 डिसेंबर : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 जानेवारी दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
‘राज्याचा क्रीडा दिन’ –
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दरवर्षी ‘राज्याचा क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. तसेच क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा 2 लाख 25 हजार रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले राज्याचे क्रीडा मंत्री? –
क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे याप्रसंगी म्हणाले की, भारताला पहिले वैयक्क्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव वाढवणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान आणि नव्या खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, याकरता त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून दरवर्षी संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा परिचय –
स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना संबोधले जाते. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर नावाच्या गावात झाला होता. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरूवात केली होती. खाशाबा जाधव यांना कुस्तीची चांगली जाण होती. ते तर स्पर्धकाला उचलून अक्षरश: जमिनीवर फेकायचे. त्यांची हेड लॉकिंग स्टाइल जबरदस्त होती.
1952 सालच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी जर्मनी, मेक्सिको आणि कॅनडाच्या खेळाडूंना पराभूत करून कांस्य पदकाची कमाई केली. 1984 मध्ये खाशाबा जाधव यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला.