ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 ऑगस्ट : 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहासाठी पाचोरा-भडगाव उपविभागाचे महसूल अधिकारी-कर्माचारी सज्ज आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी महसूल विभागासंदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर त्यांनी समस्या प्रशासनापर्यंत पोहचवा. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी दिली. प्रांताधिकारी कार्यालयात काल 31 जुलै रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी महसूल सप्ताहाची माहिती दिली.
प्रांताधिकाऱ्यांनी दिली महसूल सप्ताहाची माहिती –
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहातबाबत राबविण्याच्या सूचना केल्या. तसेच सर्वसामान्यांच्या कामे राबविण्यासाठी त्यांनी महत्वपुर्ण आदेश दिले असल्याची माहिती पाचोरा-भडगावचे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी दिली. प्रांताधिकारी अहिरे यांनी यावेळी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी पाचोऱ्याचे तहसिलदार विजय बनसोडे तसेच भडगावच्या तहसिलदार शितल सोलाट आदी उपस्थित होते.
‘असे’ आहे महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे स्वरूप –
1 ऑगस्ट – महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ
महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ.
2 ऑगस्ट – शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम.
3 ऑगस्ट – पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे.
4 ऑगस्ट – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे.
5 ऑगस्ट – विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे.
6 ऑगस्ट – शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे.
7 ऑगस्ट – M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ.