पाचोरा, 4 जुलै : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात आज शुक्रवार 4 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या भयानक घटनेत एक तरूणाचा मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय – 32, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी परिसर सील केला आहे. पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आकाश मोरे हा तरूण बसस्थानक परिसरात असताना त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी दहा-ते बारा राऊंड फायर करत गोळीबार केला. यामध्ये आकाश मोरे हा तरूण गंभीररित्या जखमी झाला आणि या गोळीबाराच्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
View this post on Instagram
गोळीबारात तरूणाचा मृत्यू –
पाचोरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आकाश मोरे या तरूणास ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यानंतर पाचोरा पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक तपास पथकाला पाचारण केले. यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे.
पोलिसांकडून वेगाने तपास सुरू –
तसेच घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी पाचोऱ्यात दाखल झाले असून घटनेसंदर्भात ते माहिती घेत असल्याचे समजते. दरम्यान, हा गोळीबार कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून केला जातोय. पाचोरा बसस्थानक परिसरात झालेल्या गोळीबारात तरूणाच्या मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.