ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 फेब्रुवारी: पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करत व्हॉट्सअॅप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती तसेच तक्रार निवारण बाबतची माहिती नागरिकांपर्यंत व्हॉट्सअॅप पाठविण्यात येणार आहे. या अत्याधुनिक चॅटबॉटचे लोकार्पण नगराध्यक्षा सुनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पाचोरा नगरपालिकेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमित किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, सभापती प्रवीण ब्राह्मणे, सभापती रेहमान तडवी, सभापती प्रियांका पाटील, सभापती मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरपरिषद नगरसेवक व नगरसेविका हे उपस्थित होते.
View this post on Instagram
‘असा’ आहे चॅटबॉट –
पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांसाठी ऑटोमेशन आणि एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स उपलब्ध करुन दिला आहे. हा चॅटबॉट नागरिकांच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची गरज लागणार नाही. नागरिकांना आवश्यक असलेली माहिती घरबसल्या उपलब्ध होऊ शकणार आहे. पहिल्यांदाच एका नगरपरिषदेत असा एआय चॅटबॉटचा वापर केला आहे. यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी, सुविधा तसेच सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्या योजनांचा सर्वसामान्यांना सुलभतेने लाभ मिळावा या उद्देशाने प्रत्येक विभागाने 150 दिवसात करावयाच्या कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
150 दिवसांच्या आराखड्यानुसार प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विभागाचे संकेतस्थळ, नागरिकांचे सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणूक प्रसार, कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ई ऑफिसचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (एआय) आदी मुद्दे ठरवून देण्यात आले होते.
यापैकी अनेक मुद्द्यांची तांत्रिक सांगड घालत प्रकल्प राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगरपरिषदेने घेतला. त्यानुसार, पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी व नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील सर्व नागरिकांनी सदर एआय चॅटबोटचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुनीता किशोरआप्पा पाटील यांनी केले आहे.
‘अशी’ मिळवता येईल माहिती –
18002335259 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप वर मेसेज करून आपल्याला माहिती मिळवता येईल व शहरातील समस्यांविषयी तक्रारी नोंदविता येईल.






